Friday, September 19, 2008

रंग माझा वेगळा ! ( Rang maza Vegala )

रंगुनी रंगांत साऱ्या रंग माझा वेगळा!
गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा!

कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे;
मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा!

राहती माझ्यासवे ही आसवे गीतांपरी;
हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा!

कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो
अन् कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा ?

सांगती 'तात्पर्य' माझे सारख्या खोट्या दिशा
’चालणार पांगळा अन् पाहणारा आंधळा !'

माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी
माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा !

प्रेम ....

दाटून आलेल्या संध्याकाळी
अवचित ऊन पडतं
तसंच काहीसं पाऊल न वाजवता
आपल्या आयुष्यात प्रेम येतं


शोधून कधी सापडत नाही
मागुन कधी मिळत नाही
वादळ वेडं घुसतं तेव्हा
टाळू म्हणून टळत नाही

आकाश पाणी तारे वारे
सारे सारे ताजे होतात
वर्षाच्या विटलेल्या मनाला
आवेगांचे तुरे फुटतात


संभ्रम स्वप्न तळमळ सांत्वन
किती किती तऱ्हा असतात
साऱ्या सारख्याच जीवघेण्या
आणि खोल जिव्हारी ठसतात


प्रेमाच्या सफल-विफलतेला
खरंतर काही महत्त्व नसतं
इथल्या जय-पराजयात
एकच गहिरं सार्थक असतं

मात्र ते भोगण्यासाठी
एक उसळणारं मन लागतं
खुल्या सोनेरी ऊन्हासारखं
आयुष्यात प्रेम यावं लागतं.......